न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली
आपण सर्वांनी न्यायदेवतेचा (Lady of Justice) पुतळा पाहिला आहे
यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे.न्यायदेवतेच्या एका हातात तलवार, तर दुसऱ्या हातात तराजू दिसतो. तसेच या न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आपण पाहिली आहे. मात्र, आता न्यायालयांमध्ये न्यायदेवतेचा नवा पुतळा पाहायला मिळू शकतो. कारण, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा (New Lady of Justice) बदलण्यात आला आहे. या पुतळ्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यापैकी प्रमुख बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच तिच्या एका हातात तराजू तर दुसऱ्या हतात तलवारीऐवजी भारतीय संविधान दिसत आहे. ऑल इंडिया रेडिओ न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवून न्यायदेवता अंध नाही,कायदा अंध नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारित असल्याचं नमूद करण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवारीची जागा आता भारतीय संविधानाने घेतली आहे.
आधी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी होती. ही पट्टी म्हणजे समानतेचं प्रतीक मानलं जात होती. याचाच अर्थ न्यायालयासमोर सर्वजण सारखेच आहेत. नेता, सेलिब्रेटी, श्रीमंत, गरीब असा भेदभाव न्यायदेवता करत नाही. तर हातातील तलवार ही गुन्हेगारांना शिक्षा देण्याची शक्ती दर्शवते