आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर
प्रदिप रासकर
निमगाव भोगी : १९८ शिरुर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन १५ ऑक्टोबर २०२४ पासुन आचारसंहिता चालु झाली आहे. निवडणुक काळामध्ये राजकीय पक्ष, नेते कार्यकर्ते यांनी आचारसंहितेचे कडेकोट पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
त्यामुळे शिरुर-हवेली विधानसभेसाठी प्रशासन सज्ज झाले असुन २२ ऑक्टोबर पासुन उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असुन हे उमेदवारी अर्ज शिरुर तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या चेंबर मध्ये स्वीकारण्यात येणार असल्याचे राजापुरकर यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती शिरुर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगिता रांजापुरकर यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुक काळामध्ये कायदा सुव्यवस्था व आचारसंहितेचे पालन व्हावे याकरीता निवडणुक आयोगाने तक्रार अॅप तयार केले असुन त्यावर तक्रार करायची आहे. त्या तक्रारीचे निरासन करण्यात येणार असुन यासाठी शिरुर तहसिल कार्यालय येथे कंट्रोल रुमची उभारणी केली आहे. तसेच या अनुषंगाने शिरुर-हवेली तालुक्यामध्ये नऊ फ्लाईंग स्कॉडची स्थापना केली असुन हे २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच ३ स्थायी पथकाची नेमणुक केली असुन शिरुर तालुक्यासाठी दोन तर हवेली तालुक्यासाठी वाघोली येथे १ पथक असणार आहे. तर शिरूर सतराकमानी पुलाजवळ एक चेक नाका तसेच तांदळी येथे एक चेक नाका असणार आहे. त्याबरोबर एक फिरते पथक राहणार आहे.
निवडणुकीचे उमेदवार यांना त्यांच्या सभेसाठी, रॅलीसाठी, लाऊड स्पीकरसाठी, वाहनांसाठी व इतर शासकीय परवानगीसाठी शिरुर तहसिल कार्यालय येथे एक खिडकी योजना सुरु केली आहे. त्यासाठी नायब तहसीलदार तसेच नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, महसुल विभाग व इतर विभागाचे अधिकारी या ठिकाणी परवानगी देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. शिरुर विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक अर्ज भरणे दि २२ ऑक्टोबर ते दि २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत आहे. तर अर्ज छाननी दि ३० ऑक्टोबर आणि अर्ज मागे घेणे शेवटची दि ३० ऑक्टोबर ते दि ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत आहे. निवडणुक मतदान दि २० नोव्हेंबर २०२४ आणि निवडणुकीचा मतमोजणी दि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरुर विधानसभा मतदार संघात ४ लाख ५९ हजार ६९३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २ लाख ३८ हजार ८९७ तर महीला मतदार २लाख २० हजार ७७३ तर इतर मतदार २३ एवढे आहेत.
शिरुर तालुका एकुण मतदार २ लाख ११ हजार ४०९, पुरुष मतदार १ लाख ७ हजार २४७, महीला मतदार १ लाख ४ हजार २५२, इतर १०, हवेली तालुका एकुण मतदार २ लाख ४८ हजार २३१, पुरुष मतदार १ लाख ३१ हजार ६२७, महीला मतदार १ लाख १६ हजार ५९१ इतर १३ असे एकुण शिरुर विधानसभा मतदार संघात ४ लाख ५९ हजार ६९३ मतदार आहेत. आर्मी नोकरीत असणारे ४०३ मतदार, ३५४६ दिव्यांग मतदार आहेत. तर ८५ वर्षांवरील ५४९० मतदार आहेत. या निवडणुकीसाठी शिरुर-हवेली तालुक्यात करिता ४५७ मतदान केंद्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजारपुरकर यांनी सांगितले आहे.